Stock Market updates: भारतीय शेअर बाजारासाठी मंगळवारचे ट्रेडिंग सत्र संमिश्र होते. सकाळपासून दुपारपर्यंत बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू होते. पण व्यवहाराच्या शेवटच्या तासात वरच्या स्तरावरून प्रॉफिट बुकींग दिसून आले. बाजार बंद होण्याच्या वेळी, सेन्सेक्स 31 अंकांच्या वाढीसह 71,386 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 32 अंकांच्या वाढीसह 21,544 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्स 680 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी सुमारे 200 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.
आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले. तर बँकिंग, मीडिया, एफएमसीजी आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील समभाग घसरले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 वाढीसह आणि 15 घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 शेअर्स वाढीसह आणि 23 घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांना फायदा –
दिवसाच्या उच्चांकावरून बाजार घसरला असला तरी गुंतवणूकदारांनी नफा कमावला आहे. BSE वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांनी वाढून 367.51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 366.51 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यापारात बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात लार्सन 1.55 टक्के, भारती एअरटेल 1.50 टक्के, टाटा मोटर्स 1.32 टक्के, सन फार्मा 1.25 टक्के, टाटा स्टील 1.21 टक्के, एनटीपीसी 1.11 टक्के, टेक महिंद्रा 0.97 टक्के वाढीसह बंद झाले. तर नेस्ले 1.03 टक्के, एशियन पेंट्स 0.90 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.88 टक्के, एचडीएफसी बँक 0.80 टक्के, अॅक्सिस बँक 0.57 टक्के, टायटन 0.37 टक्के घसरणीसह बंद झाले.