शेअर निर्देशांक वाढण्यास आणखी वाव

रिऍल्टी, औषधी, पायाभूत सुविधा, आयटी क्षेत्र आकर्षक

मुंबई – विकासदर कमी होणार असताना शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत असल्याबद्दल अनेक जण चिंता व्यक्‍ त करीत आहेत. मात्र, निर्देशांकाची वाढ योग्य प्रमाणात आहे आणि आगामी काळातही भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत जातील, असे शेअर एंटरप्राइजेसचे भागीदार राकेश झुनझुनवाला यांनी म्हटले आहे.

एका दैनिकाशी बोलताना झुनझुनवाला म्हणाले की, रिऍल्टी, औषधी, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्‍यता आहे आपल्या वैयक्‍तिक मतानुसार भारत आगामी काळात वेगाने वाढणार आहे. त्या प्रमाणात शेअरबाजाराचा निर्देशांक वाढणार आहेत. ते म्हणाले की, माझे मत चुकीचेही असू शकते.

गुंतवणुकीस अमर्याद वाव 

अमेरिकेत नागरिकांच्या एकूण बचतीपैकी 32 टक्‍के रक्कम शेअरबाजारात जाते. भारतात हे प्रमाण केवळ 7 टक्के आहे. आता भारतीय शेअरबाजारांचे कामकाज व नियंत्रण अमेरिकन शेअरबाजारासारखेच होत असल्यामुळे शेअरबाजाराची विश्‍वासार्हता वाढली आहे. त्यामुळे शेअरबाजारातील गुंतवणूकीस प्रचंड वाव आहे, असे झुनझुनवाला म्हणाले. गेल्या काही महिन्यात डी- मॅट खात्यांची संख्या वाढत आहे, हे त्याचेच लक्षण आहे.

ते म्हणाले की, गुंतवणूकदार भूतकाळ किंवा वर्तमानकाळापेक्षा भविष्यकाळाकडे अधिक लक्ष देतात. आगामी काळात कंपन्यांचा नफा वाढणार आहे, असे गुंतवणूकदारांना वाटते. करोनाबाबत बोलताना ते म्हणाले की, करोनाचे बरेच रुग्ण बरे होत आहेत. करोना सर्दी, पडसे, खोकला अशा स्वरूपातील आहे. तो कॅन्सरसारखा नाही. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही, असे गुंतवणूकदारांना वाटते.

करोनामुळे अर्थव्यवस्थेवर युद्धासारखे व्रण उमटणार नाहीत. मात्र, करोनाने आपल्याला दोन धडे शिकविले आहेत. एक म्हणजे आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि अशा प्रकारच्या आपत्तीबाबत आपण अधिक सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

कोणती क्षेत्रे वेगाने पूर्वपदावर येतील, असे विचारले असता, ते म्हणाले की, आदरातिथ्य आणि हॉटेल उद्योगावर जास्त परिणाम झाला आहे. ही क्षेत्रे पूर्वपदावर येण्यास उशीर होईल. मात्र, इतर क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येतील.

सरकारने जारी केलेल्या कृषी आणि कामगार क्षेत्रातील सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने वाढण्यास पूरक वातावरण निर्माण झाले आहे. देशात सध्या 8 लाख कोटी रुपयांचे दूध निर्माण होते. या दूध निर्मितीवर आणि विक्रीवर कसलीही बंधने नाहीत. याचा कृषी उत्पन्न बाजार समित्याशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे हे क्षेत्र वाढत आहे. असाच प्रकार इतर कृषी उत्पादनाबाबत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.