पीडितेचा नातलग असणाऱ्या मुलाचा व्हिडीओ केला शेअर
नवी दिल्ली – हाथरस प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. उत्तरप्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी पाशवीपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
हाथरस पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्यापासून गुरूवारी राहुल आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांना रोखण्यात आले. त्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांनाही भेट नाकारण्यात आली. पत्रकारांनाही पीडितेच्या कुटूंबीयांपर्यंत पोहचू दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी ट्विटरवरून उत्तरप्रदेश सरकारवर निशाणा साधला. आ
मच्याबरोबरच मीडियालाही पीडितेच्या कुटूंबीयांना भेटू देण्यात आले नाही. पीडितेच्या कुटूंबीयांना घराबाहेरही पडू दिले जात नाही. त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे समजते. कुठलाच भारतीय अशा वर्तणुकीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी म्हटले.
ट्विटसमवेत राहुल यांनी एक व्हिडीओही शेअर केला. त्या व्हिडीओत पीडितेचा नातलग असणारा आणि तिच्याच गावात राहणारा एक लहान मुलगा बोलताना दिसतो.
पीडितेच्या कुटूंबीयांना मारहाण झाली. त्यांना कुणालाच भेटू दिले जात नाही. त्यांचे फोन पोलिसांनी काढून घेतले आहेत. त्यांचे घर आणि लगतचा परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे. कुणालाही तिथे जाऊ दिले जात नाही अन् बाहेरही पडू दिले जात नाही, असे वर्णन त्या मुलाने केले आहे.