खासगीकरणाच्या रुळावर भारतीय रेल्वे; 1.41 लाख रिक्‍त पदे भरण्यास सरकार उदासीन

 

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेमध्ये जवळपास 1.41 लाख पदे रिक्‍त आहेत. अगोदर रेल्वेने या पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मागील आठवड्यात रेल्वेने सर्व झोन व्यवस्थापकांना पत्र पाठवून आश्‍चर्यचकित केले आहे. या पत्रात नवीन भरती न करणे आणि रिक्‍त पदांमध्ये 50 टक्‍के कपात करण्यासंबंधी म्हटले आहे.

यावर वादविवाद सुरू झाल्यावर रेल्वे प्रशासनाने मौन धारण केले आहे. मात्र ही उघड बाब आहे की, भारतीय रेल्वे आता खासगीकरण्याच्या रुळावरून धावण्यास तयारी करीत आहे. उशिरा धावणे आणि सतत अपघातामुळे चर्चेत राहणारी भारतीय रेल्वे आता करोनामुळे आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्कला रुळावर आणण्यासाठी सरकार रेल्वेच्या स्वरूपात बदल करण्याच्या तयारीत आहे. यानुसारच हजारो पदांमध्ये कपात करण्याबरोबरच नवीन नियुक्‍त्यांवरही लगाम आणि देशातील अनेक रुटवरील ट्रेनना खासगी हातात देण्यासारखी पावले उचलली जात आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रेल्वे सुरक्षेसंबंधी पदांमध्ये कपात केली जाणार नाही.

रेल्वे कर्मचारी यूनियन या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. भारतीय रेल्वेमध्ये 12 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. महसुलातील जवळपास 65 टक्‍के हिस्सा कर्मचाऱ्यांवर खर्च होतो. 2018 मध्ये रेल्वेने सुरक्षा विभागात 72 हजार 274 आणि इतर विभागात 68 हजार 366 रिक्‍त पदांची घोषणा केली होती. सध्या रेल्वेत जवळपास 1.41 लाख रिक्‍त पदे आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.