वॉशिंग्टन – अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंग संधू यांनी आज अमेरिकेतील शिख नागरिकांशी त्यांच्या समस्यांच्या संबंधात चर्चा केली. यावेळी भारताच्या विकासातही योगदान देण्याची सूचना त्यांनी शिख बांधवांना केली. त्याला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.
या बैठकीला अमेरिकेतील शंभर प्रख्यात शिख नागरिक उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत संधू यांनी भारत अमेरिका यांच्यातील व्यापक संबंधांबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी भारताच्या शिक्षण, पर्यावरण आणि अन्य सामाजिक विषयांमध्ये मदतीची तयारी दर्शवली आहे. विशेषत: या क्षेत्रात आम्ही पंजाबला मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पंजाबसाठी काहीतरी करण्याची उर्मी या नागरिकांमध्ये आहे. त्यांना भारताच्या व पंजाबच्या विकासासाठी उद्युक्त करण्याचे काम संधू यांनी ते मागच्यावेळी अमेरिकेचे राजदूत असताना केले होते. आता त्यांनी पुन्हा हे काम हाती घेतले आहे. त्याला शिख बांधवांचा मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता, अशी प्रतिक्रिया संधू यांनी दिली आहे.