नवी दिल्ली – ब्रिटनचे प्रिंस चार्लस यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांना भारतातील एका आर्युेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी बरे केल्याचा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला होता. पण हा दावा ब्रिटनने फेटाळून लावला आहे.
श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते की, डॉ. इसाक मथाई हे बंगलुरू येथे सौख्य आयुर्वेदिक रिसॉर्ट चालवतात. त्यांनी प्रिंस चार्लस यांच्यावर आयुर्वेद आणि होमिओपॅथीची ट्रिटमेंट दिली होती असे या डॉक्टरांनी मला सांगितले होते असे श्रीपाद नाईक यांनी म्हटले होते. ब्रिटनच्यावतीने यावर खुलासा करताना सांगण्यात आले की, भारतीय मंत्र्यांनी दिलेली ही माहिती चुकीची असून प्रिंस चार्लस यांनी ब्रिटन सरकारच्या एनएचएस सल्ल्यानुसार करोनावर उपचार करून घेतले. त्यातून ते बरे झाले आहेत. त्यापेक्षा त्यांनी वेगळे काहीही केलेले नाही असेही ब्रिटन तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या रिसॉर्टला प्रिंस चार्लस आणि त्यांच्या पत्नीनी या आधीही भेट दिली आहे. त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धतीविषयी उत्सुकताही आहे पण येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रिंस चार्लस हे करोनातून बरे झाले हा दावा सपशेल खोटा आहे असेही ब्रिटन कडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्यावतीने करोनाग्रस्तांसाठी एक तात्पुत्या स्वरूपातील फिल्ड हॉस्पीटल उभारण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आज प्रिंस चार्लस यांच्या हस्ते झाले.