इस्लामाबाद – जगभर थैमान घालणारा करोना विषाणु नेमका उद्भवला कसा याची चौकशी केली जावी आणि हा विषाणू मानवनिर्मीत आहे की निसर्ग निर्मीत याचाही शोध घेतला जावा अशी मागणी पाकिस्तानातील एका खासदाराने थेट संयुक्तराष्ट्रांच्या सरचिटणीसांकडेच केली आहे. या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र आयोग नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रहमान मलिक असे ही मागणी करणाऱ्या पाक संसद सदस्याचे नाव असून ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्रीही आहेत.
संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, याची चौकशी करण्यासाठी जो आयोग नेमला जाईल त्यात जीवशास्त्रज्ञ, संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञांचा समावेश केला जावा. येत्या तीन महिन्यात त्याचा अहवाल लोकांपुढे आला पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
करोनाच्या निर्मीती विषयी आणि त्याच्या प्रसाराविषयी अनेक कथा आणि बातम्या आत्तापर्यंत देशविदेशातल्या माध्यमांमधून आल्या आहेत. त्यातून लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने करोनाची निर्मीती नेमकी कशी झाली याची जागतिक पातळीवरील तज्ज्ञांकडूनच चौकशी झाली पाहिजे. लोकांमध्ये या विषयी निर्माण झालेला भ्रम जोपर्यंत दूर होणार नाही तो पर्यंत या विषाणुंविषयीची भीती नाहींशी होणार नाही असेहीं त्यांनी म्हटले आहे.