नवी दिल्ली : रायसिना हिल्स येथील भारतीय लष्कराचे मुख्यालय असणारा साऊथ ब्लॉक बुधवारी बंद ठेवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. हे कार्यालय गुरूवारपासून केवळ 15 टक्के उपस्थितीवर सुरू करण्यात येणार आहे.
संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत म्हणाले, देश अशा अवस्थेत आहे, जेथे लष्कराला त्यांच्या नियमित कामाशिवाय देशसेवा करावी लागणार आहे. कोरोनाविरूध्दच्या लढ्यात देशवासीयांची मदत करावी लागणार आहे. यापुर्वी लष्कराने मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के केली होती. कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश यापुर्वी देण्यात आले आहेत.
कोरोनाला रोखण्याच्या प्रत्यक्ष कार्यात सहभागी असणाऱ्या तसेच अत्यावश्यक आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे. कामावर येण्याच्या वेळाही 9 ते 5.30 आणि 9.45 ते 6.30 अशा विभागण्यात आल्या आहेत. गेटवर होणारी गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लषकराने सोमवारी त्यांचे कॅंटीन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी किराणा सामान घरपोच देण्याची व्यवस्था केली.