भूवनेश्वर – भारतीय फुटबॉल संघाने लेबननचा 2-0 असा पराभव करत इंटरकॉंटिनेंटल करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकली. आता या विजेतेपदानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय फुटबॉल संघ येत्या गुरुवारपासून बंगळूर येथे सुरू होत असलेल्या सॅफ स्पर्धेसाठी सज्ज बनला आहे.
भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री व लाललियनझुलाला चांगटे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारताने लेबनन संघावर 2-0 असा विजय मिळवला. भारताने पहिला गोल 46 व्या मिनिटाला केला. निखिल पुजारी व लाललियनझुलाला चांगटे यांनी अफलातून खेळ केला.
याचा फायदा घेत सुनील छेत्रीने भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चांगटे याने 66 व्या मिनिटाला गोल करीत ही आघाडी 2-0 अशी वाढवली व तीच अखेरपर्यंत टिकवली.
ओडिशा सरकारकडून कोटींचे बक्षीस
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी इंटरकॉन्टिनेंटल करंडक विजेत्या भारतीय पुरुष फुटबॉल संघासाठी एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. आजवर ओडिशा सरकारने हॉकीसह भारतीय फुटबॉललाही सातत्याने पाठिंबा दिला असून प्रोत्साहनही दिले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या बक्षिसावर सुनील छेत्री याने आभार व्यक्त केले आहेत.