भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार- रामदेवबाबा

नांदेड: भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक,राजनैतिकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन 2040 ते 2050 दरम्यान भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात योगगुरु स्वामी रामदेव बाबा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार डॉ. तुषार राठोड आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.

नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.

आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एकाचवेळी एकाच ठिकाणी 91 हजार 323 लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.

यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र श्री. विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या ‘पवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पतंजलीच्या वतीने स्वदेशी समृद्धी कार्ड अंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्याचा अपघात होऊन जायबंदी झालेल्या कार्यकर्त्यांना पाच लाखाचा धनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला

Leave A Reply

Your email address will not be published.