नोटरीची कागदपत्रे मिळकतींच्या नोंदीसाठी ग्राह्य नाहीतच – श्रावण हर्डीकर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मिळकतकराची नोंद करताना शासनाने ठरवून दिलेली नोंदणीकृत कागदपत्रेच स्विकारार्ह असून नोटरीच्या कागदपत्रांवर मिळकराची नोंद करता येणार नसल्याचा खुलासा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज झालेल्या सर्वसाधारण सभेत केला.

पिंपरी-चिंचवड शहरात लाखो अनधिकृत बांधकामे आहेत. यातील एक हजार चौरस फुटापेक्षा कमी बांधकामांना शास्तीकरातून वगळण्यात आले आहे. तर एक ते दीड हजार चौरस फुटाच्या बांधकामाला पन्नास टक्के तर त्यापुढील बांधकामांना दुप्पट शास्ती लावण्याचा शासनाचा आदेश आहे.

शहरातील प्राधिकरणाच्या अनेक जागांवर पक्की बांधकामे झाली आहेत. या बांधकामांचे खरेदीखत होत नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी केवळ नोटरीवरच व्यवहार होत आले आहेत. यातील बहुतांश कुटूंब आजही एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्याने अनेक ठिकाणी दोन-तीन किंवा त्यापेक्षा अधिक मजली इमारती बांधल्या आहेत. एक हजारापेक्षा अधिक बांधकाम असल्यामुळे दुप्पट शास्तीकर या ठिकाणी आकारला जात आहे.

भावांचे वाटणीपत्र नोटरीद्वारे होत असल्याने महापालिकेने नोटरी कागदपत्रांच्या आधारे मिळकतकराची नोंद लावावी, अशी मागणी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी सभेत केली होती. त्या मागणीवर बोलताना आयुक्‍त हर्डीकर यांनी वरील खुलासा केला. ते म्हणाले, नोंदणी करून घेण्यासंदर्भात शासनाचे काही नियम आहेत. हस्तांतरण कागदपत्रे ही रजिस्टरच असावी लागतात. आपण आता नोटरीवर नोंदी लावल्यास भविष्यात जेव्हा ऑडिट होईल, तेव्हा पालिकेला अडचण होऊ शकते. तसेच कर्मचारी व अधिकारीही अडचणीत येवू शकतात. नोटरी कागदपत्रांवर नोंद करण्याची कायद्यात तरतूद नसल्यामुळे केवळ रजिस्टर कागदपत्रांच्या आधारेच नोंद केली जाईल. आयुक्‍तांच्या या खुलाशामुळे मिळकतकराच्या नोंदीसाठी राजिस्टर कागदपत्रेच ग्राह्य मानली जाणार हे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)