मुंबई – सरलेल्या केवळ एक वर्षांमध्ये भारतामधील युनकॉर्नची संख्या तब्बल 33 अंकांनी वाढली आहे. त्यामुळे युनिकॉर्नच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ज्या स्टाट अप्चे बाजार मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा म्हणजे साधारणपणे आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असते अशा कंपनीला युनिकॉर्न असे संबोधले जाते.
गेल्या वर्षापर्यंत भारत त्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेतील युनिकॉर्नची संख्या 254 ने वाढून आता 487 इतकी झाली आहे. चीनमध्ये सरलेल्या वर्षात युनिकॉर्नची संख्या 74 ने वाढून 301 झाली आहे. जगातील एकूण युनिकॉर्नपैकी चीन आणि अमेरिकेमधील युनिकॉर्नची संख्या 74 टक्के इतकी भरते.
सरलेल्या वर्षात या यादीत 673 नव्या कंपन्या आल्या तर 201 कंपन्या यादीतून बाहेर पडल्या. ब्रिटनमध्ये सरलेल्या वर्षात नव्या 15 युनिकॉर्नची नोंद झाली. या देशातील एकूण युनिकॉर्नची संख्या आता 39 आहे. भारतातील युनिकॉर्नचे संख्या आता 54 इतकी झाली असल्याचे हरून अहवालात म्हटले आहे. युनिकॉर्न संदर्भात भारताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील यूनिकॉर्नची संख्या 54 असली तरी भारतीय वंशाच्या नागरिकांनी इतर देशात सुरू केलेल्या युनकॉर्नची संख्या 65 आहे.
यातील बहुतांश युनिकॉर्न अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत आहेत. भारतात बंगळुरू शहरात जास्त युनिकॉर्न आहेत. पुणे, ठाणे, गुडगाव या शहरातही युनिकॉर्नची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतातील नव्या कंपन्यांची वेगात वाढ व्हावी याकरिता केंद्र सरकारने मोहीम हाती घेतली आहे. या कंपन्यांना भांडवल उपलब्ध व्हावे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्याच आठवड्यात नव्या कंपन्यांना भांडवल पुरवठा करणाऱ्या गुंतवणूकदारांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली होती. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या कंपन्या वाढल्याशिवाय भारत वेगात विकसित होणार नाही असे सरकारचे म्हणणे आहे.