न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांमध्ये स्थायी सदस्य म्हणून आफ्रिकेतील कोणताही देश नसल्याच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे भारताने म्हटले आहे.
परिषदेतील निम्याहून अधिक विषय हे आफ्रिकेशी संबंधित असले तरीही स्व-हिताचे रक्षण करण्यासाठी कायमस्वरुपी सदस्यत्व असलेला असा एकही आफ्रिकन देश यात नाही, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात मोठ्या संस्थेने अशी ऐतिहासिक विसंगती दुरुस्त करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. श्रृंगला काल रात्री शांतता आणि सुरक्षा राखण्या संदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या एका खुल्या चर्चेत बोलत होते.
समकालीन जगातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या आफ्रिकेच्या उत्क्रांती आणि वाढीचे त्यांनी स्वागत केले. आफ्रिकेतील शांतता आणि संघर्षानंतरच्या पुनर्बांधणीत एकत्रित होण्यासाठी आफ्रिकन युनियनची अग्रणी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.