नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याच्या प्रती आता सर्वच पोलीस ठाण्यांत पाठविण्याची प्रक्रिया पोलीस दलाने सुरू केली आहे.
दरम्यान, पारनेर येथील न्यायालयाने काल बाळ बोठे याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या स्टँडिंग वॉरंटचा अर्ज मंजूर केल्याने आता त्याच्या तपासासाठी गती येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी बोठे याच्या स्टँडिंग वॉरंटसाठी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
काल (दि. 6) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी स्टँडिंग वॉरंट अर्ज मंजूर केला. आता बोठेच्या तपासासाठी अटक वॉरंट काढून आरोपीस ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती तपासी अधिकार्यांनी दिली. त्यातही आरोपी मिळून न आल्यास पुढील कारवाई करून सर्वच पोलीस ठाण्यात स्टँडिंग वॉरंटच्या प्रती पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रात्री हत्या झाली. त्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली आहे. ही हत्या सुपारी देवून झाल्याचे तपासात उघड झाले असून, संशयित आरोपी सागर भिंगारदिवे यांच्याकडील तपासात या हत्येमागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे पुढे आले आहे. पोलीस उपाधीक्षक पाटील यांनी स्वत: 2 डिसेंबरला या संदर्भात माध्यमांना माहिती दिली. मात्र, तेव्हापासून बाळ बोठेे हा पसार आहे.
बोठे याच्या शोधासाठी पोलीस महिन्याभरापासून त्याच्या मागावर आहेत. तथापि, तपासी पथकांना हुलकावणी देण्यात तो यशस्वी होत आहे. दरम्यान त्यानेे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर बोठे याच्यावतीने आता औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे.
बोठे याच्यावतीने अॅड. संकेत ठाणगे यांनी स्टँडिंग वॉरंट अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला स्टँडिंग अर्ज मंजूर केल्याने बोठे याच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. आता बोठे याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर कधी सुनावणी होते? याकडे तपासी यंत्रणेसह सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पोलिसांनी जामीन मिळू देऊ नये : लगड
रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांनी बोठे यास खंडपीठातून जामीन मिळू नये, यासाठी प्रभावी युक्तिवाद करायला हवा, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे. त्या संदर्भात लगड यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.