* एकाच दिवसात सुमारे 11 हजार बाधित आढळण्याचा उच्चांक
* देशातील बाधितांची संख्या आता 3 लाखांच्या घरात
* एकाच दिवसात उच्चांकी 396 बाधितांचा मृत्यू
* बाधित करोनामुक्त होण्याचे प्रमाण 49.47 टक्के
नवी दिल्ली: करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारताच्या नावे आणखी एक नकोशी कामगिरी नोंदली गेली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत ब्रिटनला मागे टाकून भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. आता त्या संख्येत केवळ अमेरिका, ब्राझील आणि रशिया हे देशच भारतापुढे आहेत.
भारतात शुक्रवारी एकाच दिवसातील उच्चांकी करोनाबाधितांची आणि बळींची नोंद झाली. गुरुवार सकाळपासून 24 तासांत देशात नवे 10 हजार 956 करोनाबाधित आढळले. एकाच दिवसात 10 हजारांहून अधिक बाधितांची नोंद होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. सलग आठव्या दिवशी देशात 9 हजार 500 हून अधिक बाधितांची भर पडली. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या 3 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्या संख्येमुळे जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचत भारताने ब्रिटन आणि स्पेन या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी असणाऱ्या देशांना बरेच मागे टाकले आहे.
ब्रिटनमध्ये 2 लाख 91 हजार तर स्पेनमध्ये 2 लाख 89 हजारांहून अधिक बाधित आहेत. जगातील सर्वांधिक करोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्या देशात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 20 लाखांपेक्षा अधिक आहे. करोनाबाधितांच्या संख्येत ब्राझीलने 8 लाखांचा तर रशियाने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. अर्थात, जागतिक क्रमवारीत पहिल्या सहा स्थानांवर असलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारत आणि रशियात तुलनेने खूप कमी जीवितहानी झाली आहे.
दरम्यान, भारतात गुरुवार सकाळपासून 24 तासांत 396 करोनाबाधित दगावले. एकाच दिवसातील बळींचा तो उच्चांक ठरला. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. करोना संकट चिंता वाढवणारे असले तरी रुग्ण बऱ्या होण्याच्या वेगाने देशाला दिलासा मिळत आहे.
देशात सलग तीन दिवस सक्रिय बाधितांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची अधिक संख्या नोंदली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सुमारे 1 लाख 42 हजार सक्रिय बाधित आहेत. तर बऱ्या झालेल्या बाधितांची संख्या 1 लाख 47 हजारांपेक्षा अधिक आहे. बाधित करोनामुक्त होण्याचे देशातील प्रमाण 49.47 टक्के इतके आहे.