तरौबा, वेस्ट इंडिज – कर्णधार हनुमा विहारी व रिद्धीमान साह यांनी केलेल्या शैलीदार भागीदारीमुळेच भारत “अ’ संघास वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्धच्या तिसऱ्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात 201 धावांचा पल्ला गाठता आला. उर्वरित खेळांत विंडीजची पहिल्या डावात 1 बाद 23 अशी स्थिती झाली.
मयांक अग्रवालने 5 चौकारांसह 33 धावा करूनही भारताचा डाव 4 बाद 48 असा अडचणीत सापडला होता. पहिल्या फळीतील अभिमन्यु ईश्वरन व शुभमन गिल यांना खातेही उघडता आले नाही. विहारी व साह यांनी आत्मविश्वासाने खेळ केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 22 षटकांत 86 धावांची भागीदारी केली. विहारीने 55 धावा करताना 5 चौकार मारले. कसोटीसाठी भारताच्या वरिष्ठ संघात निवड झालेल्या साह याने या मालिकेत भारत “अ’ संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने येथे 9 चौकार व एक षटकारासह 62 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा घसरला. एका बाजूने शिवम दुबेने दमदार खेळ करीत 26 धावा केल्या.
विंडीजकडून केमोर होल्डर व अकिम फ्रेझर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर यान्निक करिहाने दोन विकेट्स घेतल्या. विंडीजच्या दुसऱ्या डावास सुरूवात खराब झाली. त्यांच्या मॉन्टकिन हॉज याला कृष्णप्पा गौतमने बाद करीत सनसनाटी धक्का दिला.
संक्षिप्त धावफलक –
भारत “अ‘ पहिला डाव 67.5 षटकांत सर्वबाद 201 (रिद्धीमान साह 62, हनुमा विहारी 55, मयांक अग्रवाल 33, शिवम दुबे 26, केमोर होल्डर 3-47, अकिम फ्रेझर 3-53, यान्निक करिहा 2-45)
वेस्ट इंडिज “अ’ पहिला डाव 15 षटकांत 1 बाद 23 (कृष्णप्पा गौतम 1-6)