कोरेगाव – शहरासाठी स्वतंत्र 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना अमृत दोनमध्ये मंजूर झाली असून त्यासाठी 67 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे. लवकरच या योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. सॅटेलाईटद्वारे ही योजना कार्यान्वित होणार असून नगरपंचायत कार्यालयात बसून शहराच्या कोणत्या भागाला किती पाणीपुरवठा होत आहे याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.
कोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने सुमारे चार कोटी 13 लाख रुपये खर्चून कठापूर येथील पंप हाऊस, कोरेगाव औद्योगिक वसाहतीतील
पंप हाऊस आणि नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयाच्या छतावर कार्यान्वित करण्यात येत असलेल्या सोलर ग्रीडचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे,
माजी नगरसेवक सचिन भैय्या बर्गे, कोरेगाव ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन नारायण बर्गे, नियोजन समितीच्या सभापती वनमाला प्रदीप बर्गे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती संगीता नितीन ओसवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शीतल संतोष बर्गे, ज्येष्ठ नेते विलासराव बर्गे, प्रगतीशील शेतकरी सुरेश काटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. कोरेगाव शहर पाश्चिमात्य देशातील शहरांच्या दर्जाचे करण्याचा निर्धार असून त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. शहरातील सर्व रस्ते ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण केले जात असून बंदिस्त गटारांची कामे मंजूर आहेत. 30 टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 70 टक्के कामे दृष्टिक्षेपात आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये शहरात मागेल तेथे रस्ता आणि मागेल तेथे बंदिस्त गटार ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरेगाव शहर स्वच्छ व सुंदर बनविले जाणार आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
कोरेगाव शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मार्गी लागली. शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन विकासकामांना पाठबळ देण्याची आहे. ज्येष्ठांनी घरात न बसता विकास कामांवर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरेगाव नगरपंचायतीच्या उत्पन्नवाढीसाठी लक्ष दिले आहे. 42 कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समावेशन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आझाद चौकातील भाजी मंडई संकुलासारखी चार संकुले शहरात वेगवेगळ्या ठिकाणी येत्या वर्ष दीड वर्षात बांधून पूर्ण करत आहोत. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत दीड कोटी रुपये एका तासांतच मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पातून कचरा एका ठिकाणी आणून जाळला जाणार आहे. यातून तयार होणाऱ्या राखेतून वीट निर्मिती केली जाणार आहे. या विटांच्या विक्रीतून नगरपंचायतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. किरण बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महेश बर्गे यांनी आभार मानले.