रेडा -देशपातळीवर गौरविलेल्या इंदापूर नगरपरिषदेने कचरामुक्त शहर निर्माण केल्याने शासनाचे थ्री स्टार नामांकन इंदापूर नगरपरिषदेला मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात नगर परिषदेने सहभाग नोंदवून शहरातील गल्लीबोळ व बाजारपेठ चकाचक ठेवत शहर कचरामुक्त केले आहे. नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असून, एक आदर्श शहर निर्माण झाले आहे.
कचरामुक्त इंदापूर पॅटर्न राबवल्याने शासनाने याची दखल घेत थ्री स्टारसाठी निवड केली आहे. नगराध्यक्षा शहा म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने नगरपालिकेतील हद्दीचा चेहरामोहरा सुधारण्यासाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी मेहनत घेतली आहे. आगामी काळात असेच काम केले जाईल.
इंदापूर नगरपरिषदेने फिरते अन्नछत्र, गरजू कुटुंबांसाठी 1268 जीवनावश्यक वस्तूचे किट नागरिकांना मोफत दिले आहे. स्वच्छ व सुंदर इंदापूर राहण्यासाठी सातत्याने फवारणी परिसरात करीत आहे. ज्यांना रेशन कार्ड नाहीत अशांचा सर्वे केला असून, यामध्ये 373 लाभार्थी सापडले आहेत.
यापैकी 230 नागरिकांना तांदूळ, गहू वाटप केला आहे. चेकपोस्टच्या माध्यमातून बाहेरगावचे नागरिक आढळून येतील अशांना आरएचमध्ये तपासणी करण्यासाठी पाठवले जात आहे. त्यांना क्वारंटाइन केले जात आहे.
-डॉ. प्रदीप ठेंगल, मुख्याधिकारी, इंदापूर.