#INDvNZ 4th T20 : भारताचा ‘सुपर ओव्हर’मध्ये न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय

वेलिंग्टन : भारत-न्यूझीलंड दरम्यान झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला असून पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. शार्दुल ठाकूर हा सामन्याचा मानकरी ठरला.

अतितटीच्या झालेल्या या चौथ्या सामन्यात निर्धारित २०-२० षटकानंतर बरोबरी झाली. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर झाली. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना टिम सीफर्टच्या ४ चेंडूत ८ आणि काॅलिन मुनरोच्या २ चेंडूत ५ धावांच्या जोरावर १ बाद १३ धावा करत भारतासमोर १४ धावांचे आव्हान ठेवले होते. सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने ५ चेंडूत १ विकेटच्या मोबदल्यात १६ धावा करत सुपर ओव्हर मध्ये विजय मिळविला. भारताकडून राहुलने ३ चेंडूत १ चौकार व १ षटकारांसह १० तर कोहलीने २ चेंडूत १ चौकारासह नाबाद ६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साउदीने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टीम साउदीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ८ बाद १६५ अशी मजल मारत न्यूझीलंडसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाकडून मनीष पांडेने ३६ चेंडूत ३ चौकारासह नाबाद ५०, लोकेश राहुलने २६ चेंडूत ३ चौकार व २ षटकारासह ३९, शार्दुल ठाकुरने १५ चेंडूत २०, विराट कोहलीने ९ चेंडूत ११, शिवम दुबेने ९ चेंडूत १२ आणि  नवदीप सैनीने ९ चेंडूत नाबाद ११ धावांची खेळी केली. संजू सॅमसन ८, श्रेयस अय्यर १ धाव काढून झटपट बाद झाले.

न्यूझीलंडकडून ईश सोढीने ४ षटकांत २६ धावा देत ३ गडी तर हेमिश बेनेटने ४ षटकात ४१ धावा २ गडी बाद केले. तर मिशेल सॅटनर, स्काॅट कुग्गलिन आणि टीम साउदीने प्रत्येकी १ गडी बाद केला.

त्यानंतर विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला निर्धारित २० षटकात ७ बाद १६५ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली आणि मालिकेत पुन्हा एकदा सामना टाय झाला. न्यूझीलंडकडून काॅलिन मुनरोने ४७ चेंडूत ( ६ चौकार व ३ षटकार) ६४, टीम सीफर्टने ३९ चेंडूत (४ चौकार व ३ षटकार) ५७ आणि राॅस टेलरने १८ चेंडूत (२ चौकार) २४ धावांची खेळी केली.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने ४ षटकात ३३ धावा देत २ तर जसप्रीत बुमराह  आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.