दिवसभरात 354 बाधितांची नोंद
पुणे – गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढत असून, रविवारी तब्बल 354 बाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांमध्ये ही सर्वाधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारीही बाधितांची संख्या 331 होती.
शहरात सुमारे महिना-दीड महिन्यांमध्ये बाधितांची आकडेवारी शंभर ते दीडशे मध्येच होती. एकदाच बाधितांची आकडेवारी 100 च्या आत म्हणजे 98 होती. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाणही कमी म्हणजे पाचच्या आत आणि एके दिवशी एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली. मात्र असा एकच सुदिन ठरला.
शनिवारपासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली असून, शनिवारी 331 तर रविवारी तब्बल 354 बाधितांची नोंद झाली. आजपर्यंत 1 लाख 94 हजार 954 बाधितांची नोंद करण्यात आली असून, त्यातील 1 लाख 88 हजार 534 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र अद्यापही 1661 ऍक्टीव्ह रुग्ण असून, त्यातील 145 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दिवसभरात तीनजण मृत्युमुखी पडले असून, मृतांची एकूण आकडा आता 4799 झाला आहे. आजपर्यंत 10 लाख 71 हजार 815 संशयितांची स्वॅबटेस्ट घेण्यात आली असून, रविवारी 3508 स्वॅब टेस्ट करण्यात आल्या.
वातावरण बदलामुळे बाधितांची संख्या वाढू शकते. हे एक कारण असले तरी लॉकडाऊनमधील मोठ्याप्रमाणात मिळालेली शिथिलता, नागरिकांचा मुक्त वावर यादेखील बाबी याला कारणीभूत आहेत. पूर्ण क्षमतेने सुरू झालेली कार्यालये आणि बाजारपेठा, सणसमारंभ ही देखील बाधितांची आकडेवारी वाढण्यामागील कारणे आहेत.
– डॉ. संजीव वावरे, महापालिकेतील सह आरोग्य अधिकारी