मुंबई – शेअर बाजारात सकाळी निवडक खरेदीमुळे निर्देशांक वाढते होते. मात्र अखेरच्या सत्रामध्ये ग्राहक वस्तू, बॅंकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली. त्यामुळे दिवसाअखेर शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 100 अंकांनी कमी होऊन 53,134 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी म्हणजे 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 15,810 अंकावर बंद झाला.
ऊर्जा, आरोग्य, धातू, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, वाहन, रिऍल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 0.35 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.20 टक्क्यांनी कमी झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधक दीपक जसानी यांनी सांगितले की, सकाळी निर्देशांकात वाढ झाली होती. मात्र दुपारी युरोपियन बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री केली. आता गुंतवणूकदारांचे लक्ष लवकर जाहीर होणाऱ्या कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे राहणार आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून काल या गुंतवणूकदारांनी 2,149 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.