“शिष्यवृत्ती’साठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा

शालेय शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश : परीक्षा दि.16 फेब्रुवारी रोजी

पुणे – इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि. 16 फेब्रुवारी रोजी होत आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत 100 टक्‍के शाळा आणि किमान 50 टक्‍के विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 11 लाख विद्यार्थी बसावेत, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने राज्य परीक्षा परिषदेचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यापूर्वी शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता चौथी व सातवी वर्गांसाठी घेण्यात येत होती. मात्र, राज्य शासनाने यापुढे चौथी व सातवी इयत्ताऐवजी पाचवी व आठवी वर्गांसाठी सुरू करण्याचा निर्णय 2015 रोजी घेतला. तसेच राज्य शासनाने पूर्व प्राथमिक पहिली ते पाचवी, तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिक आणि नववी ते दहावी माध्यमिक अशी इयत्ताची रचना केली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता पाचवी व आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत आहेत.

सन 2015 पूर्वी चौथी व सातवी इयत्तांमधून शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 16 लाखांच्या आसपास होती. आता मात्र शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. गतवर्षी 8 लाख 66 हजार 131 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्यावरून शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.

कार्यशाळा आयोजित कराव्यात
याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप आणि माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी काढले आहे. या परीक्षेचे उद्‌बोधन करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व शाळांचे मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित कराव्यात. सर्व शिक्षाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापकांची विशेष सभा घेऊन या परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रवृत्त करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.