नवी दिल्ली – केंद्र सरकारने विमानाचे इंधन आणि डिझेलच्या निर्यातीवरील करात वाढ केली आहे. त्याचबरोबर कच्चे तेल उत्पादन करणाऱ्या देशातील कंपन्यावरील विंडफॉल टॅक्स ( Windowfall tax ) वाढविला आहे.
दोन महिन्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तेल उत्पादक आणि तेल शुद्धीकरण करणाऱ्या कंपन्यावर हा कर लावला होता. जागतिक बाजारामध्ये तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर या कंपन्यांना जास्त नफा होत होता. त्यामुळे हा कर लावण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला या कराचा आढावा घेतला जातो.
गुरूवारी घेतलेल्या आढाव्यानुसार कराचे नवीन दर जाहीर करण्यात आले. या अगोदर डिझेल निर्यातीवर प्रति लिटरला सात रुपये निर्यात कर लावण्यात आला होता. आता तो वाढवून 13 रुपये 50 पैसे इतका करण्यात आला आहे. विमान इंधनावर प्रति लिटर दोन रुपये निर्यात शुल्क होते. ते आता नऊ रुपये करण्यात आले आहे. देशात तयार होणाऱ्या कच्च्या तेलावर अगोदर 13 हजार रुपये प्रति टन विंडफॉल टॅक्स होता तो आता 13,300 करण्यात आला आहे.
एक सप्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरूवारी रिलायन्स कंपनीच्या शेअरच्या भावामध्ये 3% पर्यंत घट झाली. पंधरा दिवसातील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेऊन केंद्र सरकार विंडफॉल टॅक्स आणि निर्यात शुल्काचे दर ठरवित असते. आगामी काळातही अशा प्रकारे या किमतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.