नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यातील वाढीव जीएसटी संकलनाची आकडेवारी अर्थ मंत्रालयाकडून आज जारी करण्यात आली. ऑगस्ट महिन्यामध्ये जीएसटी संकलन 28 टक्क्यांनी वाढून 1.43 लाख कोटी रुपये झाले आहे.
उत्सवात ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीएसटी संकलन आहे त्या प्रमाणात वाढणार आहे. केंद्र सरकारने काही वस्तूवर जीएसटी वाढविला आहे. त्याचबरोबर ग्राहकाकडून मागणी वाढली आहे. कर चूकवेगिरी टाळण्यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कर संकलन वाढत असल्याचे दिसून येते.
गेल्या सहा महिन्यापासून जीएसटी कर संकलन 1.4 लाख कोटीपेक्षा जास्त झाले आहे. वाढत असलेल्या जीएसटी संकलनाबाबत बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, महागाई वगळता भारतातील स्थूल अर्थव्यवस्था उत्तम आहे. त्याचबरोबर महागाई कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये देशभर आर्थिक घडामोडी वाढत आहेत. त्यामुळे मागणी वाढत आहे. वस्तूची मागणी वाढत असल्यामुळे या वस्तूवर लावण्यात आलेला अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी वाढत आहे.
भारतामध्ये सप्टेंबर -ऑक्टोबर दरम्यान अनेक महत्त्वाचे सण येतात. या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये जीएसटी संकलन आणखी वाढण्याची शक्यता आहे. कालच भारताचा विकासदर 13.5% वर गेल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे.
त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढवण्याची आकडेवारी आज जाहीर झाली. वाहनांची विक्री वाढत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळामध्ये वेगाने वाटचाल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे