गुजरातमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या महिलांमध्ये वाढ

अहमदाबाद – गुजरातमध्ये तंबाखू खाणाऱ्या आणि सिगारेट ओढणाऱ्या पुरुषांच्या संख्येत 10.3 टक्क्यांनी घट झालेली असतानाच सिगारेट-तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांच्या संख्येत 1.3 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे – एनएफएचएस) ही बाब आढळून आली आहे.

या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार 2005-06 मध्ये गुजरातेत 60.2 टक्के पुरुष तंबाखू-सिगारेटचा वापर करत होते. 2015-16 पर्यंत त्यात घट होऊन ते प्रमाण 51.4 टक्क्यांवर आले. 2091-20 पर्यंत त्यात आणखी घट होऊन ते 41.4 टक्क्यांवर आले.

शहरी भागातील 33.6 टक्के पुरुष तर ग्रामीण भागातील 46.7 टक्के पुरुष तंबाखू-सिगारेटचा वापर करतात. एनएफएचएसच्या 2015-16 मधील सर्वेक्षणात हेच प्रमाण शहरी भागात 46 टक्के तर ग्रामीण भागात 56.2 टक्के होते.

त्या तुलनेत महिलांमधील तंबाखू आणि सिगारेटच्या वापराच्या प्रमाणात फक्त एक टक्क्याने घट झाल्याचे दिसते. 2005-06 मध्ये तंबाखूचा वापर करण्याचे महिलांमधील प्रमाण 8.4 टक्के होते. त्यामध्ये 2015-16 मध्ये अल्प घट होऊन ते 7.4 टक्क्यांवर आले आणि 2019-20 मध्ये त्यात वाढ होऊन ते 8.7 टक्क्यांवर पोचले. ग्रामीण भागातील 11 टक्के तर शहरी भागातील 5.4 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील अधिकाऱ्यांच्या मते पुरुष अन्य कोणत्याही तंबाखूपेक्षा तंबाखूमिश्रित गुटखा किंवा पानमसाला खाणे पसंत करतात. ग्रामीण भागात बिडी ओढण्याकडे जास्त कल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.