बीजिंग – करोनाची साथ पसरण्याच्यामागील नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे पथक येत्या 14 जानेवारीला चीनला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनवर होत असलेली टीका आणि चीनकडून होत असलेल्या प्रतिवादाच्या पार्श्वभुमीवर या दौऱ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. चीनच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली असल्याने या दौऱ्याबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली. जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ 14 जानेवारीला चीनमध्ये प्रत्यक्ष पहाणी करणार असून करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या कारणांचा शोध घेणार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी एका माध्यमांना सांगितले. या संशोधनासाठी चीनने जगभरातील संशोधकांना सहकार्यच केले असल्याचे लिजियान यांनी म्हटले आहे. मात्र या तज्ञांच्या वेळापत्रकाबाबत काहीही माहिती देण्यस लिजियान यांनी नकार दिला. तसेच या तज्ञांना “वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी’ला भेट देण्याची परवानगी दिली गेली का, हे सांगण्यासही त्यांनी नकार दिला. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांचे दहा सदस्यांचे पथक वुहानला भेट देण्याची अपेक्षा आहे, परंतु ते वुहान विषाणू संस्थेला भेट देतील का हे अद्याप स्पष्ट झाले नाही.