पुणे – मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वातावरणातील उकाडा वाढला आहे. येत्या आठवडाभरात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असून, तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बऱ्याच भागात लक्षणीय वाढ झाली होती. कोकण, गोव्याच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 40.6 अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे 14.2 अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील आठवडाभर पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी सकाळी पुणे येथे 36.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 14.9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले आहे. तर लोहगाव येथे 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमान, पाषाण येथे 36.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 16.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.