खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अडचणीत वाढ

वडिलांच्या नावे असलेले पीक उतारे बोगस असल्याचा दक्षता पडताळणी समितीचा अहवाल
सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शनिवारी सुनावणीच्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समितीला आढळून आली. खासदार महास्वामी यांनी मागील तारखेला बेडा जंगम जातीच्या पडताळणीसाठी तलमोड (गुंजोटी, तालुका उमरगा) येथील वडिलांच्या नावे असलेले पीक उतारे दिले होते.

हे उतारे बोगस असल्याचा अहवाल शनिवारी दक्षता पडताळणी समितीने दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयावर म्हणणे मांडण्यासाठी खासदार महास्वामी यांच्या वकिलांनी मुदत मागितल्यानंतर 15 फेब्रुवारी 2020 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

राजेंद्र मुळे, प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे यांनी महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखल बोगस असल्याची तक्रार केली आहे. 27 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत महास्वामी यांनी तलमोड येथील वडिलांच्या नावे असलेले उतारे पुराव्यासाठी सादर केले होते. ते उतारे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांनी खातरजमा करण्यासाठी दक्षता पडताळणी समितीकडे दिले होते.

या समितीने उमरगा तहसील कार्यालयात जाऊन संबंधित रजिस्टरची तपासणी केली असता रजिस्टरमध्ये खासदार महास्वामी यांनी सादर केलेले पीक उताऱ्यांच्या नोंदी सुस्थितीत व पाने चिटकवलेल्या स्थितीत असून इतर नोंदी अस्पष्टपणे दिसत आहेत.

त्यावर शेतकऱ्यांच्या जातीचा कुठेही उल्लेख दिसत नाही. त्यामुळे या दोन्ही उतार्यांबाबत संशय निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने तलमोड येथील सरपंच व तेथील नागरिकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यावेळी गावातील लोकांनी हिरेमठ नावाचे कोणीसुद्धा आमच्या गावात नव्हते असे सांगितले आहे. त्यामुळे पीक उतारे बनावट असल्याचा अभिप्राय दक्षता समितीने दिला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.