हैदराबाद – आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुप कंपनीवर केलेल्या छापेमारीत ही रक्कम सापडली आहे. या कंपनीच्या उत्पादनाची निर्यात विदेशात होते. त्यात अमेरिका, यूरोप, दुबई आणि काही आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
आयकर विभागाच्या छापेमारीत डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच काही पुरावेदेखील सापडले आहे. कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन यांचा त्या पुराव्यात समावेश आहे. तसेच तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.