बंगळूरू – शेतीच्या कारणासाठी घेतलेले कर्ज वेळेत फेडता न आल्याने कर्नाटकमधील एका व्यक्तीची अतिशय बिकट अवस्था झाली असून तो गेल्या सतरा वर्ष जंगलामध्ये एका मोडक्यातोडक्या मोटारीमध्ये राहात आहे.
56 वर्षाच्या या व्यक्तीचे नाव चंद्रशेखर गौडा असे असून कृषी कर्ज चुकवण्याच्या कामात त्याने आपली दीड एकर जमीनही विकली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलीया या नावाच्या गावाजवळील जंगलात पांढरी मोडकी अँबेसिडर उभी असून गेले 17 वर्षे गौडा याच मोटारीमध्ये जीवन व्यतीत करत आहे.
गावापासून या मोटारीपर्यंत पोहोचण्यासाठी चंद्रशेखरला तब्बल चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. रोज परिधान करण्याचे दोन कपडे आणि चपला एवढेच सामान चंद्रशेखरकडे असून त्याची शारीरिक अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
खरेतर चंद्रशेखरच्या मालकीची दीड एकर जमीन होती. या जमिनीवर तो सुपारीचे उत्पादन घेत होता. 2004 मध्ये त्याने एका सहकारी बॅंकेकडून 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले, पण शेतीतून योग्य उत्पादन मिळाल्याने चंद्रशेखर हे कर्ज फेडू शकला नाही. त्या कर्जाचे व्याज सतत वाढतच गेल्याने एकूण कर्जाची रक्कमही वाढत गेली आणि अखेर चंद्रशेखरला आपली दीड एकर जमीन विकावी लागली.
चंद्रशेखरकडे राहण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने त्याने जंगलचा आसरा घेतला आणि गेली सतरा वर्षे याच जंगलांमध्ये त्या मोडक्या अँबेसिडर मध्ये जीवन व्यतीत करत आहे.