पिंपरी, (प्रतिनिधी) – शिक्षण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट टेस्ट (पॅट) परीक्षेसाठी शाळांना प्रश्नपत्रिकांचा अपुरा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांवर झेराॅक्स काढण्याची वेळ आली. एका दिवसावर परीक्षा आलेली असताना असा गोंधळ झाल्याने सर्वांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. शासनाच्या या कारभारावर मुख्याध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘सरळ पोर्टल’, संच मान्यता आणि आकडावहीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नोंदी शासनाकडे आहेत. शाळेने गणित विषयाच्या इयत्ता पाचवीच्या ५५ प्रश्नपत्रिका मागितल्या होत्या. त्यावर, केवळ ५ प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. तसेच सहावीच्या ७८ प्रश्नपत्रिकांऐवजी ४ आणि सातवीच्या ७५ प्रश्नपत्रिका मागविल्या असताना केवळ ५ तर आठवीच्या १०० प्रश्नपत्रिकांची मागणी केलेली असताना केवळ २० प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या असल्याचे समोर आले आहे.
प्रथम भाषा, इंग्रजी आणि गणित या तीन विषयांची केंद्रीय स्तरावरील प्रोग्रेशन असेसमेंट टेस्ट अर्थात पॅट परीक्षा ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.
त्यामध्येच अनेक प्रश्नपत्रिका या दहा ते बारा पानांच्या आहेत. या प्रश्नपत्रिका जिल्हास्तरावरून प्रत्येक शाळेला वितरित केल्या जात आहेत. परंतु, शाळांनी केलेल्या मागणीनुसार प्रश्नपत्रिका मिळाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील इयत्ता तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पॅट परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, वेळेत प्रश्नपत्रिका मिळत नसतील; तर परीक्षा कशी घ्यायची ? याबाबत शाळा व शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.