वायनाड (केरळ) – कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सत्ताधारी सीपीआय (एम) ची विद्यार्थी शाखा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 19 कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले सर्व लोक एसएफआयचे स्थानिक कार्यकर्ते असून त्यांना स्थानिक न्यायालयाने दोन आठवड्यांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एसएफआय कार्यकर्त्यांनी गांधींच्या वायनाड कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर लगेचच डाव्या आघाडीच्या सरकारने या घटनेची एडीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि कलपेट्टा पोलीस उपअधीक्षकांना निलंबित केले. तथापि सत्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या संमतीनेच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेस पक्षाने केला आहे.
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. साठेसन यांनी आज सकाळी तोडफोड झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि सरकारवरील आरोपाचा पुनरूच्चार केला. राहुल गांधी यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या माजी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. तथापि, मुख्यमंत्री विजयन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून हल्लेखोरांना कठोर शासन केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांभोवती एक किलोमीटरचा इको-सेन्सिटिव्ह झोन करणे अनिवार्य केले आहे,या आदेशाला केरळच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यासंबंधात आंदोलनही सुरू झाले आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांनी लक्ष न दिल्याने त्यांच्या कार्यालयावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.