वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे पीएमआरडीए च्या वतीने झोन बाबतचा नकाशा अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आला असून या नकाशा मध्ये खाण, औद्योगिक, शेती व इतर झोन बाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या असून लोकप्रतिनिधींनी या तक्रारींचा पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पीएमआरडीए च्या हद्दीतील गावांचा झोन बाबत काही ठिकाणी शेती, झोन मधून निवासी झोन मध्ये बदल झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे खाण, औद्योगिक, तथा इतर गरज नसताना झोन पडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आपल्या भागातील लोकप्रतिनिधींनी याबाबत शासन स्तरावर आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला तून हा प्रश्न सुटू शकतो त्यामुळे अनेक शेतकरी, नागरिक यांनी या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यासाठी तगादा सुरू केला आहे.
स्थानिक पातळीवरील तसेच तालुक्यातील राजकीयदृष्ट्या वजनदार मंडळीदेखील या प्रकरणी लक्ष घातले असून वेळप्रसंगी न्यायालयाचे देखील दरवाजे ठोठावून नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया
वाघोलीत खाण, औद्योगिक, शेती झोन याबाबत तक्रारी येत आहेत. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार पीएमआरडी च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वस्तुस्थितीची पाहणी करून सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना न्याय मिळवून देणार आहे. – रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद, वाघोली)
वाघोली मधील ज्या ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या झोन बाबत तक्रारी येत आहेत त्या सर्व तक्रारी विचारात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, पी. एम.आर.डी. ए आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. – राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली)
कटकेवाडी, विठ्ठलवाडी भागात पूर्वी शेती झोन होता त्या भागात निवासी झोन ची गरज होती. आता मात्र या भागाचा समावेश औद्योगिक झोन मध्ये करण्यात आला आहे. शासनाकडे निवासी झोन साठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. दत्तात्रय कटके (माजी ग्रामपंचायत, सदस्य, वाघोली)
आमच्या पिढीजात शेतजमिनी मध्ये घरे आहेत. पायगुडे वस्ती,दळवी वस्ती, जाधव वस्ती भाग खाण झोन करण्यात आला आहे. त्यामुळे उदरिर्वाहासाठी पुढील साधन आमचे संपुष्टात येणार आहे. – किसन जाधव (सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ, वाघोली)