लखनौ –उत्तरप्रदेशातील शाहजहानपूरमध्ये गुरूवारी स्थानिक क्रीडापटूंनी निदर्शने केली. त्यावेळी त्यांनी चक्क भाजपच्या खासदाराला स्टेडियममध्ये कोंडले. काही काळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत खासदाराची सुटका केली.
खासदार अरूणकुमार सागर यांच्या पुढाकारातून स्टेडियमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला सागर उपस्थित राहिले. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या बक्षीसांची रक्कम देण्यात न आल्याचा आरोप करत स्थानिक क्रीडापटूंनी स्टेडियमबाहेर निदर्शने केली. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सागर यांच्या स्वागताचे फलक फाडून टाकले.
एवढेच नव्हे तर, निदर्शक क्रीडापटूंनी स्टेडियमचे दरवाजे बंद करून टाकले. त्यामुळे काही काळ सागर स्टेडियममध्येच अडकून पडले. त्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेडियमच्या आवारात दाखल झाले. त्यांनी निदर्शने करणाऱ्या क्रीडापटूंना शांत करून सागर यांना स्टेडियमबाहेर काढले. नंतर पत्रकारांशी बोलताना सागर यांनी घटनेला फारसे महत्व देण्याचे टाळले. क्रीडापटू उत्साहात होते. विजेत्या ठरलेल्या संघांना बक्षीसे देण्यात आली. निकाल पंचांनी ठरवले, अशा शब्दांत त्यांनी बक्षीस वितरणात कुठला भेदभाव झाल्याचा इन्कार केला.