न्हावरे -उरळगाव (ता. शिरूर) येथील करोनाबाधित शिक्षकाच्या घरातील पाच जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली. त्यामुळे उरळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. करोना बाधितांमध्य शिक्षकाचे वडील, भाऊ, मुलगा, मुलगी व भाची अशा पाच जणांचा समावेश आहे.
मूळचे उरळगाव येथील असलेले व सध्या शिरूरमधील प्रीतम-प्रकाश नगर येथे राहत असलेल्या शिक्षकाचा पाच दिवसांपूर्वी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच लॉकडाऊन काळात शिक्षकाने आपल्या मूळ गावी उरळगाव येथून शिरूर व इतर ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी उपस्थिती लावली होती. त्याचदरम्यान शिक्षकाला बाधा झाली असावी, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान गावाकडे एकत्र कुटुंब असल्यामुळे शिक्षकासह सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. त्यामुळे कुटुंबातील इतर जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर कुटुंबातील इतर चार जणांना क्वारंटाइन करण्यात आहे. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. उरळगावमध्ये महसूल व ग्राम प्रशासनाच्या वतीने जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.