नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना नोकरी – गृह राज्यमंत्री 

मुंबई:१ मे रोजी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट केला. ज्यात १५ जवानांनी प्राण गमावले. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या शैलेश काळेवर कडक कारवाईची आम्ही मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच या हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी होती. आमच्या दोन्ही मागण्या आज मान्य झाल्या.

गडचिरोली जिल्ह्यात 1 मे रोजी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली असून लवकरच नोकरी देण्यात येईल. या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल,अशी माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

दि. 1 मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व नक्षलवादी कारवाया रोखण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य प्रकाश गजभिये यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना केसरकर बोलत होते.

केसरकर म्हणाले, कुरखेडा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना लवकरच नोकरी देण्यात येईल. शहीद जवानांच्या वारसांना शासनाकडून सानुग्रह अनुदान म्हणून प्रती व्यक्ती 25 लाख याप्रमाणे 3 कोटी 75 लाख रुपये व सदनिकेची किंमत प्रती व्यक्ती 22 लाख 50 हजार रुपये याप्रमाणे 3 कोटी 37 लाख 50 हजार रुपये असे एकूण 7 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

केंद्रीय सुरक्षा निधीमधून प्रत्येक वारसाला 20 लाख रुपये असे एकूण 3 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रुपये 20 लाख 50 हजार प्रमाणे एकूण 3 कोटी 7 लाख 50 हजार मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून काढण्यात आलेल्या विम्याची रक्कम 10 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडून सानुग्रहाची रक्कम प्रत्येकी 50 हजार रुपये व विशेष बाब म्हणून 50 हजार व पोलीस कल्याण निधी अंत्यविधीकरिता 12 हजार रुपये शहीद कुटुंबियांच्या वारसांना वितरित करण्यात आले आहे. शहीद पोलीस कर्मचारी विवाहित असल्यास त्याच्या पत्नीस व अविवाहित असल्यास शहीदांच्या आईस निधी अदा करण्यात आला आहे.

नक्षलवादी कारवायांना पायबंदी घालण्यासाठी नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दलास आवश्यक ती शस्त्रे व दारुगोळा याबरोबर आधुनिक संपर्क व्यवस्था, वाहन व्यवस्था, भुसुरुंग प्रतिबंध वाहने व हेलिकॉप्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस तसेच केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या माध्यमातून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असून एरिया डॉमिनेशन कार्यवाही करुन नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. जिल्ह्यात नक्षलविरोधी कृतीकरिता केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या बटालियन, कोब्रा बटालियनच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस बलाच्या कंपन्या व जिल्हा पोलीस दल तसेच सी-60 च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुप्तवार्ता सेल तयार करुन त्याचे जाळे पसरविण्यात आले आहे. जवानांना युद्धप्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. नक्षलविरोधी शोध अभियान तसेच इंटेलिजेन्ट बेस ऑपरेशन, नाईट ॲम्बुश, नाकाबंदी यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्यात येत आहे. ग्रामभेट योजना, युवा मेळावा, क्रीडा स्पर्धा, जनजागरण मेळावे, आरोग्य शिबिर, बेरोजगारांना आय.टी.आय. प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार व्यवसाय अशा प्रकारचे जनसंपर्क कार्यक्रम राबविण्यात येत असून जनतेचे सहकार्य मिळत आहे. तसेच आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षल भरतीवर परिणाम होत आहे. नक्षलवाद्यांच्या त्रस्त कारवाईमुळे गावकरी नक्षल गावबंदी ठराव घेत असून शासनाच्या वतीने अशा गावांना सहा लाख रुपये विकासाकरिता देण्यात येतात. नागरिकांच्या सहमतीने विकास कामे करुन जिल्ह्यातून नक्षलवाद संपविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)