रेडा- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवामध्ये अनेक कलाप्रकारात सहभाग घेत ग्रामीण विभागांमध्ये इंदापूर महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय तसेच उपविजेता पदक आणि नाट्य विभागात चॅम्पियनशिप प्राप्त केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विशाल मोरे यांनी दिली. पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. चाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महोत्सवामध्ये पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
एकूण 25 कलाप्रकाराचे सादरीकरण केले आहे. ग्रामीण विभागात उत्कृष्ट महाविद्यालय, नाट्यविभागात सर्वसाधारण विजेतेपद बरोबरच काडीमोड या एकाकिंकामध्ये प्रथम क्रमांक, मोबाइलचे चांगले व वाईट परिणाम हा सामाजिक संदेश देत प्रहसनमध्ये प्रथम क्रमांक, भारतीय लोकवाद्य पकवाजमध्ये प्रथम, लोकवाद्यमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून सर्वसाधारण उपविजेता पदाचा मान मिळविला. विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक प्रा. बाळासाहेब काळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तानाजी कसबे, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. आत्माराम फलफले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विशाल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. युवराज फाळके, प्रा. मयुर मखरे, प्रा. दत्ता रास्ते उपस्थित होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.