पुणे शहरात ठिकठिकाणी “रेन वॉटर हार्वेस्टिंग’

पुणे – पावसाळा संपल्यानंतर लागवड केलेल्या रोपांना पाणी द्यायचे कुठून? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींना नेहमीच पडलेला असतो. या समस्येवर मात करण्यासाठी शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला असून शहरात विविध ठिकाणी “रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजेच भूजल पुनर्भरणासाठी विविध उपाय केले आहेत.

वाढते प्रदूषण, विविध पर्यावरणीय समस्या यावर मात करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, अनेकदा वृक्ष लागवडीच्या ठिकाणी विशेषत: टेकड्यांवर पाण्याची सुविधा उपलब्ध नसते. प्रत्येक गोष्टीसाठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा काही गोष्टी स्वत: कराव्यात यासाठी नागरिक पुढाकार घेत असून शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये बंधारा बांधणे, पाण्याच्या टाक्‍यांची व्यवस्था करणे तसेच सिमेंट क्रॉंक्रिटचे बांधकाम काढून त्याठिकाणी पाणी जमिनीत मुरेन यासाठी प्रयत्न करणे अशा विविध उपायांचा अवलंब नागरिकांकडून केला जात आहेत.

यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एकत्र येत शेकडो नागरिक काम करत आहेत. टेलस ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून अशाचप्रकारे तळजाई टेकडीवरील पाचगाव पर्वती वनविहार येथे 70 फूट लांब , 7 फूट रुंद व 2 फूट बंधारा बांधण्यात आला आहे. यासाठी संस्थेतर्फे लोकेश बापट, विनय गोखले, किमया बापट , जान्हवी बापट, अवंती गोखले यांच्यासहित इतरही अनेक नागरिक सहभागी झाले होते. 3 महिने अथक मेहनत घेत हा बंधारा बांधण्यात आला असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.