बी.टेक अभ्यासक्रमात डी.एस.देव प्रथम

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पास आऊट झाली पहिली तुकडी : 32 विद्यार्थ्यांचा समावेश

पुणे – भावी लष्कर अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानानाचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळावे. यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे नुकताच सुरू करण्यात आलेल्या बी. टेक या अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली तुकडी बुधवारी प्रबोधिनीतून “पास आऊट’ झाली. या तुकडीत 32 विद्यार्थ्यांचा सामावेश असून कॅडेट डी.एस.देव याने या अभ्यसाक्रमात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात युद्धाचे स्वरूपही बहुतांशी तंत्रज्ञानाधारित बनले आहे. सायबर, अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करत शत्रूंकडून मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचविण्याची शक्‍यता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी लष्करदेखील तितकेच सक्षम असणे आवश्‍यक आहे. विशेषत: तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर अद्ययावत आवश्‍यक आहे. लष्कराची हीच गरज ओळखून प्रबोधिनीमध्ये 2016 साली बी.टेक हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पहिली तीन वर्षे प्रबोधिनीत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर एक वर्ष एजिमला येथील नौदल प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांना बी.टेक ही पदवी प्राप्त होते. त्यानुसार प्रबोधिनीतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली तुकडी यंदा “पास आऊट’ होत आहे. यानंतर पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना नौदल प्रशिक्षण संस्थेत घ्यावे लागणार आहे.

सार्थ अभिमान वाटतोय : अजित भोसले
याबाबत एअरमार्शल अजित भोसले म्हणाले, 2010 ते 2012 साली प्रबोधिनीत उपप्रमुख म्हणून रूजू झाल्यानंतर याठिकाणी शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करण्याची एक मोठी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक दृष्टया अधिक आव्हानात्मक अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. त्या प्रयत्नाला यश मिळाले आणि प्रबोधिनीत बी.टेक अभ्यासक्रम सुरू झाला. केवळ तांत्रिक शिक्षण न देता त्याला सामाजिक शास्त्राची जोड देत “तांत्रिक-भावनिक’ स्वरूपात या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. आज हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणारी पहिली तुकडी प्रबोधिनीतून पुढे जात आहे. याचा सार्थ अभिमान वाटत आहे.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.