पेट्रोलपंप चालकास खंडणी मागणारा जेरबंद

कोठारी पेट्रोलपंपच्या व्यवस्थापकांना फोन करून 40 हजारांची मागणी
जामखेड – येथील कोठारी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापकांना फोनवरून मी मंत्रालयातून बोलतो आहे, तुमच्या पंपाविरोधात तक्रारी असून मिटवून घ्यायच्या असेल तर 40 हजार रुपये द्यावे लागतील. यानंतर काही तासांनी पुन्हा त्याच व्यक्तीने फोन करून गजानन मारणे टोळीतील असून पैसे दिले नाहीत तर बघून घेईल, अशी धमकी देऊन खंडणी मागितली होती. या खंडणी बहाद्दरला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे जामखेड पोलिसांनी अटक केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. 21 रोजी जामखेड येथील कोठारी पेट्रोलपंपाच्या दुरध्वनीवर आरोपी सुरज सुरेश काळे (वय 31 रा. श्री अपार्टमेंट, रूम नं. 7, मधुबननगर, बॅंक ऑफ इंडिया कॉलनी, सोलापूर) याने मोबाईलवरून फोन करून पंपाचे व्यवस्थापक महेश सोळंकी यांचा मोबाईल नंबर घेतला व त्यांना फोन केला की, मी मंत्रालयातून संभाजी जाधव बोलतो, तुमच्या पेट्रोल पंपाविरोधात तक्रारी असून आम्ही पंप तपासतो.

पंप तपासणीसाठी आलो तर 15 दिवस तुमचा पंप बंद राहील व तुमचा खर्च होईल, तसेच तुमची गावात चर्चा होऊन बदनामी होईल तुम्हाला मिटवून घ्यायचे असेल तर 40 हजार रुपये द्यावे लागेल असा फोन केला. या फोनकडे महेश सोळंकी यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा खंडणी मागणाऱ्या युवकाने व्यवस्थापक सोळंकींना फोन करून मी पुणे येथील गजानन मारणे यांच्या टोळीतील असून तू मला पैसे दिले नाहीत तर बघून घेईल अशी धमकी दिली.

दिवसभर याबाबत 118 मोबाईल कॉल सोळंकी यांना याबाबत केले व सदर व्यक्तीचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टला टाकला त्यामुळे फोन येणे बंद झाले. सोळंकी यांनी पंपमालक राजेंद्र कोठारी यांना फोन करून माहिती दिली. सदर व्यक्तीने कोठारी यांना फोनवर शिवीगाळ केली. यानंतर सोळंकी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीबाबत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पो. कॉ. संग्राम जाधव, मनोज साखरे यांनी खंडणीखोरास अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.