पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) गणेशोत्सवाच्या काळात मागील 7 दिवसांत प्रतिदिवस सुमारे 1 कोटी 60 लाखांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे. मात्र, पुढील 4 दिवसांत बसचे उत्पन्न 2 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
गणेशोत्सव काळात पीएमपी प्रशासन दरवर्षी जादा गाड्या संचलनात आणते. त्यावेळी पीएमपी प्रशासन जास्तीत-जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न करते. यंदाही पीएमपी प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड या भागात जादा 170 बस सोडलेल्या आहेत. इतर दिवशी पीएमपी प्रशासनाचे उत्पन्न 1 कोटी 45 लाखांपर्यंत होते. मात्र, गणेशोत्सव काळात मागील 7 दिवसांत 15 लाखांपर्यंत वाढले आहे. गणेशोत्सव संपण्यासाठी अजून 3 दिवस असून त्या दरम्यान देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडणार आहेत. यामुळे येत्या 4 दिवसांत उत्पन्न 2 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले.