पुणे – सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोव्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत शहरातील किमान तापमानात पुन्हा घट होऊ लागल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे.
दक्षिण तमिळनाडूत हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याची वाटचाल वायव्येकडे होत आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र दि. 8 नोव्हेंबरदरम्यान तयार होईल. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्पात पूर्वेकडून येणारे वारे तीव्र होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम म्हणून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आर्द्रता वाढेल. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोव्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे शहरात दिवसभर उन्हाचा चटका, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि रात्री बोचरी थंडी अशी परिस्थिती आहे.