पुणे – रेमडेसिविरसाठी अजूनही वणवण सुरूच असून, जिल्ह्याधिकाऱ्यांचे आदेश असूनही ते मिळत नसल्याची स्थिती बुधवारीही होती. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यानेच ही परिस्थिती असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंगळवारी खासगी रुग्णालयांना 3 हजार 979 इंजेक्शन्स देण्यात आले. मात्र ते अपुरे पडले. त्याची मागणी रोजची सुमारे 14 हजार इंजेक्शन्सची आहे.
त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकछत्री अंमल आणण्यासाठी आणि त्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून वितरण व्यवस्था निर्माण केली, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे.
सध्या शहरात आणि पुणे जिल्ह्यात मिळून तब्बल 20 हजार डोसेसची गरज आहे. मात्र, दररोज पुण्यासाठी दोन ते तीन हजार डोस दिले जातात. महाराष्ट्राला मिळणाऱ्या डोसपैकी 14 टक्के डोस पुण्याला मिळतात. तसेच हॉस्पिटलने मागणी केल्यापैकी त्यांना 10 टक्के डोस देण्यात येतात. तसेच बाहेर कोठेही डोस देण्यात येत नाहीत.
– दिनेश खिंवसरा, सहायक आयुक्त, अन्न व औषध