पुणे -मुंबई-पुणे ही सायकल शर्यत तब्बल चारवेळा जिंकणारे ज्येष्ठ सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे बुधवारी येथे निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा प्रशांत, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
कमलाकर झेंडे गेली काही वर्षे आजारीच होते. त्यांना पॅरालिसीसचा झटका आला होता. तेव्हापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते. नवोदित सायकलपटूंना मार्गदर्शन करण्यातही त्यांचा पुढाकार होता. भाऊ माणिक यांच्याकडून सायकलिंगची प्रेरणा घेणाऱ्या कमलाकर यांनी 1971 मध्ये सर्वप्रथम मुंबई-पुणे सायकल शर्यतीत सहभाग घेतला आणि पहिल्या प्रयत्नांत अंतिम रेषेवर ते एका मोटारसायकलवर धडकून पडले होते. त्यांच्या मागे अनेक सायकलपटू पडले.
लोकांनी त्यांना उचलले आणि त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी त्यांना आपण तिसरा क्रमांक मिळविल्याचे समजले. 1975 मध्ये कमलाकर यांनी पहिल्यांदी ही शर्यत जिंकली. त्यानंतर 1980, 1981 आणि 1982 अशी सलग तीन वर्षे शर्यत जिंकून त्यांनी हॅट्ट्रिक साधली.
हॅट्ट्रिक साधताना 1982 मध्ये त्यांनी घाटाचा राजा हा किताबही मिळविला होता. कमलाकर यांनी 1981 मध्ये मुंबई ते नाशिक ही राष्ट्रीय स्तरावरील सायकल शर्यतही जिंकली. राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक पटकावले.