नळवणेच्या सुरकुलवाडीत दोघांना आळेफाटा पोलिसांनी घेतले ताब्यात
बेल्हे – गांधी जयंतीच्या दिवशी ड्राय डे असताना नळवणे (सुरकुलवाडी, ता. जुन्नर) येथे अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर आळेफाटा पोलीस तसेच बचत गटातील संतप्त महिलांनी एकत्र येऊन कारवाई केली.
नारायण परशुराम शिंगाळ (वय 65) व संजय काशिनाथ शिंगाळ (वय 41, रा. सुरकुलवाडी, नळवणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गांधी जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान आळेफाटा पोलीस तसेच ग्रामस्थ, बचत गटातील महिला यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या देशी दारू विक्री केंद्राचा पोलखोल केला व पोलिसांनी धडक कारवाई केली.
या कारवाईत एकूण 13 जीएम संत्रा कंपनीच्या क्वॉर्टर 180 मिली मापाच्या प्रत्येकी किंमत 70 रुपयो पोलिसांनी जप्त केल्या. सुरकुलवाडी गावातील नारायण परशुराम शेंगाळ यांनी घराच्या पाठीमागे आडोशाला हा बिगर परवाना देशी दारूचा व्यवसाय सुरू केला होता.
याबाबतची फिर्याद आळेफाटा पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल सचिन लहानू रहाणे (वय 35) यांनी दिली आहे. यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, विकास गोसावी तसेच ग्रामस्थ नळवणे, सुरकुलवाडी गावच्या महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.