पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्ने सेरोलॉजिकल सर्व्हे नुकताच केला. त्यासाठी 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. यामधून दिलासादायक अहवाल प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील 81.40% नागरिकांत करोना विरुद्धच्या ऍन्टिबॉडिज असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या लाटेत असाच सर्व्हे केला होता. त्यामध्ये अवघ्या 35 टक्के नागरिकांत ऍन्टिबॉडिज आढळल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये शहरामध्ये बाधित व मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तर तिसऱ्या लाटेबाबतही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सेरो सर्व्हेवर सर्वांचेच लक्ष होते.
महापालिकेने शहरातील विविध भागांतील 10 हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले. त्यामध्ये स्त्री-पुरुष तसेच झोपडपट्टी, गावठाण व सोसायटी परिसरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला.
तर वयानुसार 6 ते 18, 19 ते 44, 45 ते 60 व 60 वर्षांवरील नागरिकांचे वयोमानानुसार गट करून नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल शुक्रवारी (दि.2) महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केला. त्यानुसार, शहरामध्ये एकूण 81. 40 टक्के नागरिकांमध्ये ऍन्टिबॉडिज आहे. तर झोपडपट्टी भागामध्ये 82.5, गावठाणामध्ये 84.5 व सोसायट्यामध्ये 80 टक्के नागरिकांमध्ये करोनाच्या ऍन्टिबॉडिज आढळल्या.
महिलामध्ये हे प्रमाण 81. 5 व पुरुषांमध्ये 81. 3 आढळून आले आहे. या सेरो सर्व्हेमुळे शहरातील व्यक्तींच्या वय व स्थानानुसार वर्गीकरण करुन त्यांच्या आरोग्याबाबत उपाययोजना करण्यासाठी या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
डेल्टा संसर्गाबाबत अनुमान नाही
शहरातील नागरिकांमध्ये ऍन्टिबॉडिजचे प्रमाण दिसत असले तरी डेल्टा प्लस संसर्गांबाबत सर्व्हे करणाऱ्या तज्ज्ञांकडे कोणतेही अनुमान नाही. बदलत्या स्वरुपात येणारा करोनावर ऍन्टिबॉडिजचा किती प्रमाणात प्रभाव पडेल याबाबत ठोस अनुमान काढण्यात आले नाही. तसेच याबाबत तज्ज्ञांकडेही कोणतीही उत्तरे नाही. त्यामुळे ऍन्टिबॉडिज समाधानकारक असल्या, तरी गाफील राहून जमणार नाही. त्यामुळे नागरिकांनी करोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.