पुणे –बहुप्रतीक्षित हडपसर-हैदराबाद मार्गावर त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे दि.9 जुलैपासून धावणार आहे. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हडपसर टर्मिनसची पाहणी केली. सध्या येथे विविध कामे सुरू असल्याने, येथून धावणाऱ्या रेल्वेचा मुहूर्त सातत्याने पुढे सरकत होता.
ही विशेष रेल्वे हडपसर येथून मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी दुपारी 3.30 वाजता सुटणार आहेत. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 3.35 वाजता हैदराबाद येथे पोहोचणार आहे. तर 8 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 8.35 वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता हडपसर टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
ही रेल्वे दौंड जंक्शन, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीरमार्गे धावणार आहे. या ट्रेनमध्ये फक्त “कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान, येथून रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना अडचणी येऊ नयेत. स्थानकावर सुविधा व्हाव्यात, या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी पाहणी केली. याशिवाय पुढील आठवडाभरात उर्वरित सेवांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.