शिमला – हिमाचल प्रदेशात आपची स्थिती उत्तरप्रदेशसारखीच होईल. तो पक्ष उत्तरप्रदेशप्रमाणे हिमाचलातही खाते उघडू शकणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी केला.
भाजपची सत्ता असणाऱ्या हिमाचलमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत दिल्ली, पंजाबप्रमाणेच राजकीय चमत्कार घडवण्याचा निर्धार आप बोलून दाखवत आहे. त्यावरून ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना आपची खिल्ली उडवली. उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या 403 पैकी एकही जागा आपला जिंकता आली नाही.
बहुतांश जागांवर आपने डिपॉझिटही गमावले. तो पक्ष हिमाचलमध्येही एकही जागा जिंकू शकणार नाही, असे ते म्हणाले. ठाकूर यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या कॉंग्रेसवरही जोरदार पलटवार केला. केंद्रात आधी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार असताना महागाईचा दर तब्बल 14 टक्क्यांवर पोहचला होता.
सध्या तो 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे. करोना संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे विविध वस्तू, खाद्यपदार्थांची पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे. त्याचा परिणाम होऊन सध्या महागाईत भर पडत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.