पणजी – वारंवार पक्षाच्या आमदारांनी कॉंग्रेस पक्ष सोडून अन्यत्र पक्षांतर केल्याने गोव्यात कॉंग्रेस पक्षाची पुरती नाचक्की झाली आहे. पण यावेळी हे वातावरण बदलण्यासाठी गोव्यात जाहीर झालेल्या कॉंग्रेसच्या 36 उमेदवारांनी येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात पाच वर्ष पक्ष न बदलण्याची शपथ घेतली आहे. आम्ही पुर्ण पाच वर्ष कॉंग्रेसबरोबरच राहु ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे.
त्यांच्याशी एकनिष्ठ राहु अशी शपथ या उमेदवारांनी घेतली आहे. 2019 साली गोव्यातील एकदम दहा कॉंग्रेस आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतरही ही गळती कायम राहिल्याने सर्वाधिक जागा पटकावणाऱ्या गोवा कॉंग्रेस मध्ये कॉंग्रेस आमदारांची संख्या केवळ दोनच राहिली होती. त्यातच कॉंग्रेस हा पक्ष गोव्यातील नागरीकांची नव्हे तर भारतीय जनता पक्षाची आशा आहे, असे विधान करून अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसला डिवचले होते.
या पार्श्वभूमीवर ही शपथ घेण्यात आली. या मंदिराबरोबरच चर्च आणि मशिदीत जाऊनही ही शपथ घेण्यात आली. कॉंग्रेस पक्ष सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे ही सर्वधर्मिय शपथ घेण्यात आली असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. कॉंग्रेसचे गोव्यातील प्रभारी पी. चिदंबरम हेही यावेळी उपस्थित होते.