बारामती -दैनिक प्रभात व एडीएस फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला पारंपारिक दांडिया महोत्सव दिमाखात आणि जल्लोषात पार पडला. शहरातील भिगवण रोडवरील चिराग गार्डन येथे आयोजित केलेल्या महोत्सवाला बारामतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विद्युत रोषणाई व संगीताच्या तालावर गरबा नृत्य करताना अवघी तरुणाई थिरकली. यावेळी बारामतीकरांची मने जिंकली.
दांडिया महोत्सवात बारामतीसह फलटण तालुक्यातील ग्रुप देखील सहभागी झाले होते. गरबा नृत्यातील विविध प्रकार सादर करीत स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रुपने बारामतीकरांची मने जिंकली. दीपमाळा हातावर व डोक्यावर घेऊन नृत्याविष्कार करीत दुर्गा मातेची केलेली आरती लक्षवेधी ठरली. यावेळी जमलेल्या तरुणाईने हातातील मोबाइल उंचावून टॉर्च सुरू केले. आरती सुरू असतानाचे हे मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह अनेकांना आवरला नाही.
“प्रभात आणि एडीएस फिटनेसच्या माध्यमातून दसरा सेलिब्रेशन करण्यात आले. दांडिया महोत्सव साजरा करताना नेहमी काहीतरी वेगळेपणा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यंदा दैनिक प्रभातची साथ मिळाल्याने उत्साह द्विगुणित झाला. या पुढील काळात देखील दसरा सेलिब्रेशन करण्याचा मानस आहे.”- ऐश्वर्या शिंदे, संचालिका, एडिएस फिटनेस ग्रुप, बारामती.
हे ठरले बक्षिसांचे मानकरी
- बालाजी अँड ग्रुप- प्रथम क्रमांक.
- आरएसजीडी- द्वितीय क्रमांक
- कोअर डान्स ग्रुप- तृतीय क्रमांक.
- संस्कृती ग्रुप फलटण चतुर्थ क्रमांक.
महिलांकडून आयोजकांना विशेष ‘दाद’
दांडिया महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. महिला, मुली आणि “कपल’ यांच्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली होती. खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. पारंपरिक दांडिया नृत्याला प्राधान्य दिले. त्यामुळे महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून महिलांनी प्रभात व एडीएस फिटनेस यांना दिल्या.
विजेत्यांना प्रभातच्या वतीने ट्रॉफी व एडीएस फिटनेस व प्रायोजकांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, भगिनी मंडळाच्या संचालिका प्रतिभा दाते, सुनिता शहा, प्रशांत सातव, माजी नगरसेवक अमर धुमाळ, ऍड. श्रीनिवास वायकर, माजी नगरसेवक सत्यव्रत काळे, आयर्न मॅन सतीश ननवरे, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स विभाग विक्रांत जाधव, रणजित तावरे, सचिन झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रायोजक मान्यवर
सोहम इंटरप्राईजेसचे सागर काटे, चव्हाण बिल्डर्सचे प्रताप चव्हाण, मुक्ताई टेक्सटाइलचे सचिन चवरे, आचार्य ऍकॅडमीचे ज्ञानेश्वर मुटकुळे, आदित्य ग्रुपचे हरिभाऊ काळे, मेहता हॉस्पिटलचे डॉ. विशाल मेहता, खत्री खटमोडे बिल्डकॉनचे आशिष खत्री, लॅक्मे सलूनचे अरूण जगताप, सलून ऍप्पलच्या अनुष्का धाडगे, आर्या एंटरप्राईजेसचे अभय यादव, दांझो फिट सेंटरच्या मोनिका काटे, प्रवीण कॉस्मेटिकचे प्रवीण भवरे तसेच हर्षद जाधव.
नेटके आयोजन; कौतुकाचा वर्षाव
दैनिक प्रभात व एडीस फिटनेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दांडिया महोत्सवाची नेटके आयोजन पाहून बारामतीकरांनी समाधान व्यक्त केले. उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतरही कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. दांडिया महोत्सवाला सहा वाजता सुरुवात झाली. कायदेशीर बाबींचे पालन करीत रात्री दहा वाजता कार्यक्रमाचा समारोप जल्लोषी वातावरणात पार पडला. कार्यक्रमामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.